वसई-विरार प्रादेशिक परिवहन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे पालघर जिल्ह्यात अपघातांत वाढ.

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये डहाणू, वाणगाव , पालघर, वाडा, तलासरी परिसरात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये अवजड वाहने, मुरूम व माती वाहतूक करणारे हाइवा मालवाहू ट्रक,  तसेच प्रवासी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वाढत्या अपघातांसाठी वसई-विरार प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नियमबाह्य वाहतूक, ओव्हरलोड वाहने, फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने, परराज्यातील वाहनांचा विनापरवाना वापर तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

मात्र अशा वाहनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर, डहाणू, वाणगाव, वाडा आणि पालघर , डहाणू, तालुक्यांमधील प्रमुख मार्गांवर दररोज हजारो वाहने धावत असतात. या वाहनांची नियमित तपासणी, फिटनेस चाचणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे ही आरटीओची जबाबदारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

अलीकडेच पालघर जिल्ह्यात घडलेल्या अनेक भीषण अपघातांमध्ये निष्काळजीपणा, अवजड मुरूम मातीचे हायवा ट्रक यांची वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहनांच्या तांत्रिक बिघाडांची कारणे समोर आली आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभागाने विशेष मोहीम राबवून नियमबाह्य वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभाग यांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवून रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील नागरिक आता अपघातमुक्त आणि सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *