पालघर
जिंदाल कंपनीच्या मुरबे बंदरासाठी सरकारी अधिकारीच झाले दलाल?

पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे प्रस्तावित जिंदाल कंपनीच्या बंदर प्रकल्पासाठी काही सरकारी अधिकारी दलालाची भूमिका बजावत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि विविध शासकीय परवानग्यांच्या प्रक्रियेत अधिकारी नागरिकांवर दबाव आणत असून कंपनीच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप होत आहे.
देशातील सर्वात मोठे वाढवण बंदर पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रस्तावित असताना त्यापासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरबे येथील जे एस डब्ल्यू या खाजगी बंदराचा घाट का घातला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांनी अनेक वेळा आपल्या हरकती नोंदवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. उलट, सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना मानसिक दबावाखाली आणले जात असल्याची तक्रार आहे.
मुरबे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बंदर प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी, शेती आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होणार असून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर संकट निर्माण होईल. त्यामुळे या प्रकल्पातील शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
