वाढवण ग्रीनफिल्ड महामार्गासाठी दगडखाण प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थानिकांचा तीव्र विरोध

वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भरावासाठी आवश्यक दगड उपलब्ध करून देण्यासाठी घारगाव येथे प्रस्तावित दगडखाण (डोंगर संपादन) प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला रविवारी बोईसरजवळ सुरुवात झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित या जनसुनावणीला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.

जनसुनावणी सुरू होण्यापूर्वीच सभामंडपाबाहेर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते. “जनसुनावणी रद्द करा”, “डोंगर वाचवा”, “पर्यावरणाची हानी थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संबंधित ग्रामपंचायतींनी प्रकल्पास हरकत नोंदवून ठराव मंजूर केले असतानाही प्रशासन जनसुनावणी पुढे नेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
स्थानिकांच्या मते, दगडखाण प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असून जलस्रोत, शेती आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे.

त्यामुळे जनसुनावणी तत्काळ पुढे ढकलून स्थानिकांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता जनसुनावणीस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत जनसुनावणीची प्रक्रिया सुरू असताना स्थानिकांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली करत जनसुनावणीदरम्यान नागरिकांकडून विविध आक्षेप व सूचना नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *