रेती गट विभागातील चंद्रकांत पवार च्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; यांच्या ‘वसुली’च्या चर्चेमुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन.
लाचलुचपत कारवाईनंतरही संवेदनशील विभागात नियुक्ती झाल्याची चर्चा

पालघर प्रतिनिधी विनायक पवार

पालघर जिल्ह्यातील जिल्हा महसूल विभागाच्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रेती गट विभागात सी. के. पवार ( चंद्रकांत पवार ) यांची झालेली नियुक्ती सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. वसई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आल्याची चर्चा असतानाही अशा अधिकाऱ्याची रेती गटासारख्या महत्त्वाच्या विभागात नियुक्ती करण्यात आल्याने विविध स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात सध्या मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेसारखे मोठे प्रकल्प सुरू असून मुरूम उत्खनन व भराव कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशा परिस्थितीत वाहन चालकांकडून कथित वसुली तसेच काही कंपन्यांकडून मासिक हप्ते घेतले जात असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तसेच, विक्रमगड तालुक्यातील औदे परिसरात चार एकर जागेवर आलिशान रिसॉर्ट व बंगला उभारण्यासाठी काही दगड क्रशिंग प्लांट मालकांकडून रेती, खडी व क्रशर साहित्य मोठ्या प्रमाणात विनामूल्य मागवून घेतल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व चर्चांमुळे महसूल विभागाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्याच्या महसुलाशी संबंधित महत्त्वाच्या विभागात वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती करणे म्हणजे महसूल खासगी स्वार्थासाठी आंदण दिल्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी झाकड यांच्याकडे नागरिकांकडून होत आहे.

चौकट : ‘मारहाणी’नंतर कारवाईतून माघार का? चर्चांना उधाण

आठवडाभरापूर्वी चहाडे नाका परिसरात पहाटेच्या सुमारास रेतीची एक व मुरूमच्या काही गाड्या पकडल्याची कारवाई सी. के. पवार यांनी केल्याचे सांगितले जाते. यावेळी पवार यांच्यावर कथित मारहाणीची घटना घडल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर संबंधित प्रकरणात अखेर कुठल्या कारणास्तव माघार घेण्यात आली, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. एरव्ही महसूल क्षेत्रातील कनिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणणारे अधिकारी स्वतः कोणत्या दबावाखाली आले, असा प्रश्न उपस्थित केला जात असून यामागील कारणांबाबत महसूल वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *