दारूने भरलेल्या कारचा पोलिसाकडून पाठलाग; ५ दुचाकींना धडक, अनेक जखमी.. वाहतूक शाखेचे हवालदार रणजीत वसावलाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह?

डहाणू प्रतिनिधी,,,,
डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी परिसरात बेकायदेशीररीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या कारचा पोलिसांकडून पाठलाग करण्यात आला. मात्र, पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच कारचालकाने भरधाव वेगाने पलायनाचा प्रयत्न करत चार ते पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवारी ते चारोटी दरम्यान वाहतूक शाखेचे हवालदार रणजीत वसावला संशयित कारचा पाठलाग करत होते. चारोटी येथून सेवा रस्त्यावरून कासा बाजारपेठेकडे वळत कारचालकाने भरधाव वेगाने वाहन पळवले. कारवाई अटळ असल्याचे लक्षात येताच चालकाने भरधाव वेगात चार ते पाच दुचाकींना धडक दिली. अखेर कारचे टायर फुटल्याने वाहन थांबले. त्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, कारमधील दुसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन कासा पोलीस ठाण्यात आणले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कासा पोलीस ठाण्यात धाव घेत वाहतूक शाखेच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. स्थानिक पोलीस ठाण्याला पूर्वकल्पना न देता पाठलाग करण्यात आला का, तसेच खाजगी वाहनातून अशा प्रकारे पाठलाग करण्याचा अधिकार हवालदारांना कोणी दिला, असा सवाल नागरिकांनी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासमोर उपस्थित केला.

तसेच, स्वतःच्या स्वार्थासाठी पाठलाग करण्यात आला असून यापूर्वीही संबंधित हवालदार अशा प्रकारे वाहनांचा पाठलाग करत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला. या पाठलागामुळेच हा अपघात घडल्याचा दावाही नागरिकांनी केला असून संबंधित हवालदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या आरोपांबाबत पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क झाल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे.

या कारमधून जप्त करण्यात आलेल्या मद्याचा मुद्देमाल, त्याची किंमत आणि गुन्ह्याची माहिती अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसून, ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या कासा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *