
पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी नागरिकांन कडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पालघर दौऱ्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आणि ठेकेदारांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी मंत्र्यांनी प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.
जव्हार , मोखाडा, तालुक्यातील विविध विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे, निधीचा गैरवापर तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता प्रत्यक्षात चौकशी व कारवाई होते का, याकडे पालघर जिल्ह्यासह जव्हार तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
