वाणगाव येथील विक्री झालेल्या हरी जीवन चारिटेबल ट्रस्टच्या जागेवरील कुळ मालक, घरमालक तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा स्वतंत्र सातबारा (७/१२ उतारा) मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन लॉथलोरियन इस्टेटस एलएलपी कंपनी कडून दिल्याने दीर्घकाळापासून या जमिनीच्या मालकी हक्क, नोंदी आणि सातबारा संदर्भातील प्रश्न प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
अनेक वर्षा पासून कुळ मालक, घरमालक आणि शेतकरी स्वतंत्र सातबारा होत नसल्याने चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर लॉथलोरियन इस्टेटस एल एलएलपी कंपनीकडून संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे स्वतंत्र सातबारे मिळावेत यासाठी महसूल विभागाकडे आवश्यक पाठपुरावा केला जाईल तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. या मुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर मार्ग निघण्याची आशा निर्माण झाली असून शेतकरी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्वतंत्र सातबारा मिळाल्यास जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील अनेक अडचणी दूर होतील, तसेच शेती, बँक कर्ज, शासकीय योजना आणि इतर प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.लॉथलोरियन इस्टेटस एल एलएलपी कंपनीकडून संबंधित सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करावे, जेणेकरून सातबारा तयार करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करता येईल, असे आवाहनही केले आहे. या प्रक्रियेमुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
