
पालघर : डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मेर तलाव येथे १५ ऑगस्ट रोजी फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज तब्बल 24 तास उलटूनही उतरवण्यात न आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले होते. मात्र, १६ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजेपर्यंत तिरंगा फडकत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मेर तलाव येथे १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ग्रामसेविका अधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आल्याची माहिती ग्रामस्था कडून देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवणे अपेक्षित असताना, त्याकडे तब्बल दीड दिवस दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
१६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. तब्बल 24 तासांहून अधिक काळ राष्ट्रध्वज न उतरवल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रध्वज हा देशाच्या अस्मितेचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक असताना, त्याच्या सन्मानाबाबत एवढी मोठी निष्काळजी कशी काय झाली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या प्रकाराची चौकशी करून राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच संबंधितांविरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे आली आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वज उतरवण्याची जबाबदारी कोणाची होती या सर्व प्रकारामुळे चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
