
बोईसर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, गटारे आणि सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या परिस्थितीत स्थानिक प्रशासन आणि बोईसर ग्रामपंचायत सरपंच यांच्या नॉट रिचार्ज मोबाईल मुळे आवश्यक उपाययोजना करण्यात अपयश आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
धनाजी नगर , दांडी पाडा, बोईसर मधील इतर भागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व पाणी निचऱ्याची कामे प्रभावीपणे करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था, नालेसफाई आणि बाधित भागांमध्ये मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली आहे.
बोईसर सरपंच व बोईसर ग्रामपंचायत प्रशासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
