माझ्या काळातीलच बिले देणार”; नगराध्यक्षांच्या वक्तव्याने ठेकेदारांत भीती, आत्महत्येचा इशारा

डहाणू : डहाणू नगर परिषदेच्या दुसऱ्या विशेष सभेत ठेकेदारांच्या थकित बिलांबाबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांनी बिले न देण्याच्या वक्तव्यामुळे शहरातील विविध कामांच्या ठेकेदारांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. “माझ्या कार्यकाळात झालेल्या कामांचीच बिले दिली जातील, मागील कामांची थकीत बिले दिली जाणार नाहीत,” असे स्पष्ट वक्तव्य नगराध्यक्षांनी केल्याने अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून, कचरा वाहतूक व सार्वजनिक सेफ्टीटॅंक सेवा पुरविणारे ठेकेदार तानाजी काकडे यांनी थकित बिले न मिळाल्यास आत्महत्या करण्याची भीती व्यक्त केली आहे. यास नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार असतील, असे नमूद करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री गणेश ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या संस्थेमार्फत गेल्या वीस वर्षांपासून डहाणू नगर परिषदेच्या आरोग्य विभागासाठी निविदेनुसार कचरा वाहतूक तसेच सार्वजनिक सेफ्टीटॅंक खाली करण्याचे काम नियमितपणे केले जात आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासक कार्यरत असल्याने या कालावधीतील बिले अद्याप अदा करण्यात आलेली नाहीत. थकीत बिलांअभावी कचरा उचलणीसाठी कार्यरत असलेल्या कामगारांचे वेतन, तसेच त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) भरणे अशक्य झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. नगरपरिषदेकडे वेळोवेळी थकीत बिलांच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती पूर्णतः डबघाईला आली असल्याचेही काकडे यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांनी नगर परिषदेच्या भर सभेत मागील कामांची थकीत बिले देण्यात येणार नसल्याची जाहीर घोषणा केल्याने ठेकेदारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थकीत बिले न मिळाल्यास कामगारांचे पगार देणे शक्य होणार नसून, अशा परिस्थितीत आत्महत्येशिवाय अन्य पर्याय उरणार नाही, अशी गंभीर भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे डहाणू नगर परिषदेतील प्रशासकीय जबाबदारी, ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध तसेच, शहरातील अत्यावश्यक सेवा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *