
नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होताच पालघर मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आल्याच पाहायला मिळतंय. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पालघर नगर परिषद हद्दीतील मतदार यादीत असलेल्या घोळा संदर्भात गंभीर आरोप केले. मतदार यादीत घोळ करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला. यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून देखील जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला इशारा दिला आहे. पद नसलेल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केले तर पुढच्या वेळेस गाठ आमच्याशी आहे अस सांगत भाजपच्या वरिष्ठांनी या पदाधिकाऱ्यांना आवर घालावा अशी मागणी कुंदन संख्ये यांनी केली आहे . पालघर नगर परिषद मतदार यादीत अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त करण्याची मागणी आम्ही वारंवार करतोय मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून आम्ही मतदारांचा हक्क त्यांना मिळवून द्यायचा नाही का असा सवाल देखील यावेळी कुंदन संख्ये यांनी भाजपला विचारला आहे.
