नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गो ग्रीन इको टेक सोल्युशन कंपनीच्या प्रदूषणाचा मुद्दा गाजणार

पालघर
राजकीय वरदहस्त लाभलेल्या मौजे सरावली येथील सर्व क्रमांक ५५ वरील प्लॉट क्रमांक ८,९,१३,१४,१९,२० वरील गो ग्रीन इको टेक सोल्युशन प्रा. ली. या प्रदूषणकारी रासायनिक कंपनी विरोधात कारवाई करण्यासाठी विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी  लक्षवेधी सूचना सादर केली आहे. यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ग्रामपंचायत सरावली यांनी जल आणि वायू प्रदूषणा संदर्भात घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या  तसेच जिल्हा प्राधिकरणामार्फत बांधकाम परवानगी न घेताच कंपनी इमारतीचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गो ग्रीन इको टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे  संचालक त्याचप्रमाणे कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात कारवाई करण्यासाठी वारंवार येणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंह यांचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणले आहेत.

गो ग्रीन इको टेक सोल्युशन प्रा.ली. या घातक घनकचऱ्यावर पुनप्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला नियमबाह्यरित्या संमती  देण्यासाठी तसेच कंपनीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाच्या ठाणे येथील माजी आमदार प्रदूषण नियंत्रण मंडळावर मोठा दबाव असल्याचा आरोप होत आहे.

आतापर्यंत या नेत्याच्या वरदहस्तामुळे कंपनीचे बोईसर येथील संचालक घातक रसायनाची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे गैरकृत्य करीत होते. मात्र हिवाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या लक्षवेधी सूचनेमुळे सरावली परिसरातील नागरिकांचे आरोग्य व पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या या कंपनीवर कायदेशीर कारवाई होण्याची अशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *