घातक प्रदूषणकारी उद्योग व गौणखनिज प्रकल्पांना – उप प्रादेशिक प्रदूषण अधिकारी वीरेंद्र सिंग यांचा वरदहस्त.!

पालघर

घातक प्रदूषणकारी उद्योग व गौणखनिज प्रकल्पांना – उप प्रादेशिक प्रदूषण अधिकारी वीरेंद्र सिंग यांचा वरदहस्त.!

पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर २ अंतर्गत येणारे घातक औद्योगिक कारखाने, दगड खदानी, क्रशर आणि आरएमसी प्लांट यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदूषण होत असून अशा मानवी आरोग्य घातक व पर्यावरणास नुकसान पोचवणारे प्रदूषणकारी कारखाने आणि गौण खनिज प्रकल्प यांच्यावर कारवाई करण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सपशेल दुर्लक्ष होत असून उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंह हे कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप होत आहे.

औद्योगिक कारखाने व प्रकल्पांवर कारवाई न करण्यासाठी वीरेंद्र सिंह यांच्याकडून दर महिन्याला लाखो रुपयांची आर्थिक वसुली केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे मेंबर सेक्रेटरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर-२ कार्यालयामार्फत तारापूर औद्योगिक क्षेत्र हद्द वगळता जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांमधील औद्योगिक कारखाने, दगड खदानी, क्रशर प्रकल्प आणि आरएमसी प्लांट यांच्यामधून जल आणि वायू प्रदूषण होऊ नये याकरिता नियंत्रण ठेवले जाते.

या सर्व प्रकल्पांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घेणे अनिवार्य आहे. मात्र उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंह यांच्या ढिसाळ कारभारामुळे सरावली, बेटेगाव, मान, वारंगडे, पालघर, आमगाव, अच्छाड या परिसरातील औद्योगिक कारखाने तसेच नागझरी, किराट, लालोंडे, गुंदले गावातील दगड खदानी, प्रसार, आरएमसी प्लांट यांच्या मधून बेसुमार प्रदूषण होत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत आहे.

यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसानी सोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होणे, धुलीकणांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम यासारख्या समस्या उद्भवत आहेत. सर्व प्रकल्पांची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमित पाहणी व तपासणी करण्याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्जन परिसरात घातक रसायनांची बेकायदा विल्हेवाट लावली जात असून तक्रार करून कारवाईची मागणी करणाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

प्रदूषणकारी औद्योगिक कारखाने व प्रकल्पांना कडून उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंह यांना कारवाई न करण्यासाठी नियमितपणे हप्ता पोहोचत असल्याचे आरोप तक्रारदार जितम घरत व जीतेंन लोकरे यांनी केला असून प्रदूषणाला जबाबदार धरत उप प्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंह यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बाबत अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *